बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा-वाफोली मार्गावर गणेश नगर येथे असलेल्या श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा सर्वभक्तगणांना सुख, समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे यासाठी मंगळवारी ‘गणेशयाग’ कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते.या सोहऴ्यात १००८ मोदकांच्या आहुती देण्यात आल्या. अनेक दांपत्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
बुधवारी माघी गणेश जयंती सोहळा पहाटे काकड आरतीने आरंभ झाला. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. काकडआरती नंतर अभिषेक व पूजा, श्री सत्यविनायक महापूजा,ठिक दुपारी १२ वा. गणेश जन्म सोहळा व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला.
सायंकाळी विविध भजनांचे कार्यक्रम तर रात्रौ श्री अष्टविनायक दशावतारी नाट्यमंडळ, निरवडे, ता. सावंतवाडी यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘माहेरवाशिणी आई भवानी’ आय़ोजित करण्यात आला होत. उत्सवानिमित्त मंदिराचे आकर्षक रंगकाम ,फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी हजारोंच्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री गणेश मंदिर सेवा समिती, बांदा च्या वतीने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.