श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा-कणकवली मार्गावरील, श्रावण हनुमान घाटीच्या धोकादायक वळणावर आज आडवली येथून चिरे वाहतूक करणारा डंपरचा रस्त्यावर दुसरा डंपर आडवा उभा असल्यामुळे अपघात झाला. यात दोन मजुरांचे पाय फ्रॅक्चर झाले तर एक जखमी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आज २७ जानेवारीला सकाळी ९ च्या दरम्यान ही घटना घटली.
आडवली येथील दुर्गाप्रसाद तुळपुळे यांच्या मालकीचा डंपर क्र.एम. एच. ०७ सी. ६१७९ हा आडवली ते गोठणे अशी चिरे वाहतुक करतांना श्रावण घाटीत समोर डंपर आडवा लावल्याने हा अपघात झाला. सध्या कणकवली आचरा मार्गावर कार्पेट टाकण्याचे काम चालू आहे. या कामाचे डंपर, श्रावण येथील हनुमान घाटी सारख्या धोकादायक वळणावर आडवा करून डंपर मधील खडी टाकण्याचे काम सुरू असतानाच, अचानक आडवलीहुन गोठणेच्या दिशेने जाणारा श्री तळपुळे यांचा डंपर ड्रायव्हर नरेश सावंत याने मोठा अपघात टाळावा म्हणून प्रसंगावधान राखून डंपर रस्त्याच्या कडेला घेतला. हे करत असताना गाडी गटारात कलंडली आणि अपघात झाला.
या अपघातग्रस्त डंपर मधून केबिनमध्ये दोन मजूर व पाठीमागे चिऱ्यांवर दोन मजूर अधिक चालक असे पाच जण होते. यामधील मागे बसलेल्या दोघांच्या पायाला एकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. तर दुसऱ्याच्या पायाला जबरदस्त मुका मार लागला आणि तिसरा जखमी झाला. तीनही जखमीना मालक तुळपुळे यांनी कणकवली येथे उपचारासाठी नेले.
या अपघाताची पहाणी करुन बेळणा पोलीस आऊट पोस्टचे पोलीस नाईक अंमलदार एस. एम. तांबे यांनी येऊन पंचनामा केला. या अपघाताला निष्काळजीपणाने कारणीभूत असलेल्या डंपर चालक कुवळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आचरा पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री देसाई आणि उपनिरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. तांबे पुढील तपास करत आहेत.
निष्काळजी पणाने डंपर रस्त्यात आडवा ठेवल्याने अपघाताला जबाबदार असणार्या या कुवळेकर चालकावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी संतापलेल्या ग्रामस्थ व वाहन धारकांमधुन होत होती. या अपघातामुळे कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. श्रावण गावचे ग्रामस्थ, माजी सरपंच प्रशांत परब व शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक ऊर्फ बंडू चव्हाण, असगणी माजी सरपंच हेमंत पारकर व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले.