अवघ्या विश्वाचा विघ्नहर्ता श्री गणराया.
संतोष साळसकर | सहसंपादक : ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ….’ या ओवी प्रमाणे माणसातील माणुसकीचे नाते जपत , एकमेकांशी आपुलकीने वागत, एकमेकांची आस्थेने चौकशी करत, वेळप्रसंगी एकमेकांच्या संकटाला धावून जात, एकमेकांशी दुजाभाव न ठेवत, संकटप्रसंगी एकमेकांना मदतीचा हात पुढे करत समाजाला एकजुटीचा आदर्शवत असणारे देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील ग्रामस्थ….! या वाडीतील ग्रामस्थांची एकजूट वाखाणण्याजोगी आहे. याच वाडीतील श्री गायगोठण गणपती मंदिरात गेली १९ वर्षे माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदा हा उत्सव बुधवारी २५ जानेवारीला साजरा होत आहे.
‘चाफेड’ या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावच्या पूर्वेला ‘दुर्गाचा डोंगर’ हा पुरातनकालीन गड आहे. तर गावची श्री गांगेश्वर-रासाई ही जागृत ग्रामदैवते याच गडाच्या पायथ्याशी घनदाट वनराईत वसलेली आहेत. या गावाला पूर्वी ‘दडगवली’ असेही म्हणायचे.
भोगलेवाडीतील काही ग्रामस्थांना श्री गणेशाने दिलेल्या दृष्टांतानुसार गायगोठण या जागृत अशा पवित्र ठिकाणी विघ्नहर्त्या श्री गणेशाची स्थापना विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सन २००४ साली ‘श्री गायगोठण गणपती मंदिर’ या नावाने करण्यात आली.
त्यानंतर वाडितील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानाने व देणगीदारांच्या सहकार्याने आकर्षक आणि देखणे असे भव्य गणेश मंदिर उभारले. लाखो भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी या श्री गायगोठण गणेशाची सर्वत्र ख्याती आहे. दरवर्षी माघी गणेश जयंतीला असंख्य भाविक मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी या लाडक्या बाप्पाला साकडे घालतात आणि इच्छापूर्ती झाल्यानंतर भक्तिभावाने आपले नवस फेडतात.
या उत्सवाला मुंबईहून चाकरमानी, माहेरवाशिणी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या उत्सवाच्या आठ दिवस अगोदर वाडीतील सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग भक्तिभावाने श्रमदान करत मंदिर व परिसराची साफसफाई करतात. सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. वाडितील ज्ञानेश्वर राजाराम भोगले यांची आकर्षक पर्णफुले सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
या मंदिरात दरवर्षी महाआरती, विविध धार्मिक, सामाजिक, मुलांचे सांस्कृतिक उपक्रम, कोजागिरी पौर्णिमा व इतरही समाजोपयोगी कार्यक्रम पार पडतात. या मंदिराच्या सभामंडपाचे काम याच वाडीतील गावचे सुपुत्र, मुंबई येथील मनसेचे अंधेरी (पश्चिम) उपविभाग अध्यक्ष, राज्याचे मनसे उपाध्यक्ष किशोर विष्णू राणे यांनी स्वखर्चाने केले. याच वाडीतील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख विजय नारायण भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उत्सवाचे नीटनेटके नियोजन आणि सूत्रसंचालन केले जाते.
या उत्सवा दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, मंत्रपुष्पांजली, दिवसभर महाप्रसाद व श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, पंचक्रोशीतील सुश्राव्य भजने, रात्री श्री कलेश्वर दशावतार (सिद्धेश कलिंगण प्रस्तुत) महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पहाटे काकड आरती आणि दुसर्या दिवशी ब्राह्मण भोजनाने या उत्सवाची सांगता होते. उत्सवाच्या आदल्या दिवशी महिलांचे हळदीकुंकू पार पडते. तरी या उत्सवाला सर्व भाविकांनी श्री बाप्पाचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री गायगोठण गणपती मंडळ देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ कांडर, उपाध्यक्ष महेश भोगले, खजिनदार सत्यवान कांडर, सरचिटणीस सत्यवान भोगले यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनात श्री गायगोठण मंदिर आजही नकाशावर ठळकपणे दिसत नसले तरी त्याच्या श्रद्धेची प्रचिती व आनंद घेतलेल्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. श्री गायगोठण मंदिर, माघी गणेश जयंती उत्सव आयोजक आणि चाफेड गांव सर्वांच्या स्वागतासाठी आनंदाने सज्ज आहे…!
तर जरुर या सर्वांनी चाफेड गांवच्या श्री गायगोठण गणपती मंदिरातील माघी गणेश जयंती उत्सवाला…एका अध्यात्मिक आनंदाच्या प्रचितीला.
धन्यवाद .