बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस वाॅटस् ॲप गृपचा शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. वाॅटस् ॲप गृपमार्फत गावाला एकत्रित आणण्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगत सर्व क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी होतच राहील असे सूतोवाच बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी काढले.
पाडलोस वाॅटस् ॲप गृप तर्फे चौथ्या पर्वातील बांदा पोलिस विरुद्ध रवळनाथ पाडलोस या प्रेक्षणीय सामन्यावेळी श्री. काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ग्रा.पं. सदस्य काका परब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, पत्रकार विश्वनाथ नाईक, पोलीस पाटील रश्मी माधव, ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे तसेच त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. काळे म्हणाले की गावाला एकत्र आणण्याचे माध्यम तुम्ही ग्रुप तर्फे तयार केले आहे. गावातील बाहेरगावी असलेले नागरिक क्रिकेटमुळे एका ठिकाणी येत आहेत येत ही चांगली बाब आहे. प्रेक्षणीय सामना पाहण्यासाठी ग्रामस्थांची झालेली उपस्थिती पाहून आपण भारावून गेलो असल्याचे श्री. काळे म्हणाले. गृपचे राजा आंबेकर व प्रणित गावडे यांनी सूत्रसंचालन तर अमेय गावडे यांनी बांदा पोलिसांचे आभार मानले.