संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संवाद परिवाराने आयोजित केलेली ‘मधुर स्वर विमल’ ही शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफल अविस्मरणीय ठरली. कणकवली येथील उगवते शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय गायनाने मकर संक्रांतीची सायंकाळ संगीतमय मैफिलीने रसिकांसाठी अधिक गोड झाली. या मैफीलीत विविध राग, शास्त्रीय गीते, भक्ती, भावगीत आणि नाट्यगीते सादर करण्यात आली. हा कार्यक्रम “मधुकट्टा” येथे आयोजित करण्यात आला होता.

या मैफ़ीलीचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी डॉ.मिलिंद कुलकर्णी, अजित गोसावी, मनोज मेस्त्री, सचिन पावसकर, वामन पंडित, प्रसाद घाणेकर, दादा महाडीक आदि उपस्थित होते. या संगीत मैफीलीच्या पहिल्या सत्रात विश्रांती कोयंडे यांचे शिष्य शुभम राणे आणि संपदा दुखंडे यांनी सुंदर ते ध्यान, लाजून हासणे हासून लाजणे, ह्रुदयी प्रीत जागते, नारायणा रमा रमणा अशी विविध भक्तिगीत, भावगीत आणि नाट्यगीते सादर केलीत.

त्यानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात मनोज मेस्त्री यांनी श्याम कल्याणी राग सादर करुन केली. त्यानंतर माझे जीवन गाणे, शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, बाजे रे मुरलिया बाजे अशी अनेक गीते सादर केली. तर मनोज मेस्त्री यांनी संगीत दिलेली कवी अजय कांडर यांची धुळीच्या कणांना तुझा वास येतो, वसंत सावंत यांचे दूर नभाच्या पल्याड उभा श्रीरंग, गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांचे तुझी याद येते वेळी अवेळी अशा सुंदर रचना सादर केल्या.रसिकांनी सगळ्याच गीतांना टाळ्यांची भरभरून साथ दिली.त्याच बरोबर या संपूर्ण कार्यक्रमाला दर्दी रसिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्यामुळे ही संगीत मैफल चांगलीच यादगार ठरली.
यावेळी मनोज मेस्त्री यांना सचिन पावसकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मैफीलीला तबला साथ प्रसाद मेस्त्री, वेदांत कुवेसकर, व्हायोलियन उदय गोखले तर हार्मोनियम संदिप पेंडूरकर यांनी साथ केली. या संगीत मैफ़ीलीला कणकवली, खारेपाटण, वैभववाडी अशा विविध ठिकाणाहून रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्याम सावंत यांनी, प्रास्ताविक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी तर आभार राजू जठार यांनी मानले.