संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील “संवाद परिवार” आयोजित खास मकर संक्रांतीचे औचित्य साधून कणकवली येथील उगवते शास्त्रीय गायक श्री. मनोज भालचंद्र मेस्त्री यांच्या “मधुर स्वर विमल” या विशेष शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन संगीत मैफिलीचे आयोजन उद्या रविवारी, सायंकाळी ठीक ७ वा. तळेरे येथील मधुकट्टा (डॉ.ऋचा व डॉ.मिलिंद कुलकर्णी यांचे चैतन्य नर्सिंग होम) येथे आयोजित करण्यात आले आहे. मेस्त्री हे पं. डॉ.समीर दुबळे यांचे शिष्य असून त्यांचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.
संवाद परिवाराकडून दर महिन्याला साहित्य, कला विषयक एक उपक्रम आयोजित केला जातो. तळेरे परिसरातील रसिकांना साहित्य आणि कला विषयक अधिक अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. यापूर्वी मधुकट्ट्यावर डॉ. अरुणा ढ़ेरे, डॉ.अनिल अवचट, सुधीर सुखटणकर, डॉ. बाळ फोन्डके, प्रा. प्रदीप पाटिल, वैजनाथ महाजन, प्रसाद कुलकर्णी अशा नामवंत साहित्यिकांचे कार्यक्रम झाले आहेत. या संगीत मैफिलीत सौ. विश्रांती कोयंडे यांचे सहगायन असणार आहे. तर संदीप पेंडूरकर संवादीनी, रक्षानंद पांचाळ तबला वादन, तानपुरासाठी शुभम राणे, तालवाद्यसाठी सागर महाडीक, वेदांत कुयेसकर असणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.