खारेपाटण : प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेतील कु. प्राप्ती प्रदीप लांघी या विद्यर्थिनीची सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय स्पर्धा परीक्षेत नुकतीच निवड झाली आहे. प्राप्तीने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण केंद्र शाळा नं. १ या शाळेची नुकतीच जिल्ह्यातून मॉडेल स्कुल म्हणून राज्यात निवड झाली असून कु. प्राप्ती लांघी या विद्यर्थिनीने नवोदय परिक्षेत मिळविलेल्या यशामुळे शाळेच्या बौद्धिक प्रगतीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असल्याचे समाधान खारेपाटण जि. प. केंद्रशाळा खारेपाटण नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गौरी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी कु. प्राप्ती प्रदीप लांघी या विद्यर्थिनीच्या घरी जाऊन तीचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, अर्चना तळगावकर, सहाय्यक शिक्षिका स्मिता कोरगावकर, रेखा लांघी, अलका मोरे, अमृता ब्रम्हदंडे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.
खारेपाटण केंद्रशाळेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती प्रदीप लांघी हिची सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली असुन तिला सतत मार्गदर्शन करणारे तिच्या शाळेचे शिक्षक व तिचे आईवडील यांचे देखील खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
खारेपाटमधील शैक्षणिक प्रगतीचा वारसा प्राप्तीने पुढे नेला आहे अशी प्रतिक्रिया खारेपाटणवासियांनी व्यक्त केली आहे.
अभिनंदन प्राप्ती.