विचार करा…कृती करा…व अवलोकन करा : प्रजेश स्ट्राॅटस्की
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : अमाप स्पर्धा आणि त्याचबरोबर संधीच्या या युगात भावी आयुष्यात निसटलेल्या संधीसाठी पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्या ध्येयाप्रती think it, ink it, do it and review it असायला हवे तसेच समोरील व्यक्तीच्या देहबोलीवरून त्याच्या मनातील विचारांच्या दिशा समजून घेणे आवश्यक आहे तरच आपण जग जिंकू शकतो असे प्रतिपादन प्रजेश ट्राॅटस्की यांनी समुपदेशन कार्यक्रमामध्ये केले.
वामनराव महाडिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे आणि जी.बी.प्लस टेक्नॉलॉजी, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विद्यलयाचे माजी विद्यार्थी व तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रथितयश व्यवसायिक विनोद धुरी यांच्या माध्यमातून प्रशालेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.बी.प्लसच्या संचालिका संचिता खंडमळे यांनी केले. सदर समुपदेशन कार्यक्रमास जागतिक कीर्तीचे व्यवसाय मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. प्रजेश ट्राॅस्की मार्गदर्शक लाभले. याप्रसंगी त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व उद्बोधक कथा, प्रसंग व अनुभवांतून प्रभावीपणे पटवून दिले. तणावमुक्त अध्ययनासाठी वेळेच्या नियोजनाची आवश्यकता विशद केली. विद्यार्थ्यांनी जिज्ञासेबरोबरच ज्ञानप्राप्तीच्या बाबतीत stay selfish, stay foolish असायला हवे हे सांगतानाच परीक्षा तथा जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती व ध्येयासक्तीचे महत्त्व प्रतिपादन केले. दीडतास चाललेल्या या प्रभावी व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
प्रजेश ट्राॅटस्की हे भौतिकशास्त्र पदवीधारक असून गेल्या 22 वर्षांपासून व्यवसायाचे मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षित केले आहे. ते प्रमाणित ग्राफोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सोबत 300 हून अधिक हस्तलेखन तज्ज्ञांची टीम वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहे. प्रजेश ट्रॉस्की मोटीवेशनल स्पीकर असून अनेक शाळा व महाविद्यालयात तून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट एन.एस.एस. वॉलंंटियर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. .
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या मार्गदर्शना खाली प्रशालेचे प्रा.ए.बी.कानकेकर, पी.एम. पाटील, ए.बी.तांबे यांनी केले. कार्यक्रमास जी.बी.प्लस टेक्नॉलॉजी चे संचालक सचिन खंडमळे, संचिता खंडमळे, शाखा व्यवस्थापक सायली खंडमळे, सोनाली खंडमळे, प्रजेश ट्राॅटस्की यांचे सहाय्यक तनाज व गौरेश तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.