बांदा | राकेश परब : बांदा येथील प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. हजारो भाविकांनी श्री देव बांदेश्वर भुमिका पंचायतन देवतांचे दर्शन घेतले.श्री भुमिका मंदिरात ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. जत्रोत्सवानिमित्त श्री बांदेश्वर मंदिरात अंतर्बाह्य केलेली रोषणाई फार आकर्षक दिसत होती.या सोहऴ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे.


गुरुवारी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, श्री भुमिका माऊली ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे कार्यक्रमास आरंभ झाला. रात्रौ श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा, वार्षिक नित्य पुराण वाचन सांगता . त्यानंतर जत्रोत्सवानिमित्त खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाटयप्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसर जत्रोत्सवानिमित्त लागलेल्या विविध दुकानांनी आणि भाविकांच्या गर्दीने फुलुन गेला होता.