मालवण (प्रतिनिधी) : सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील गावाला धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर होऊनही तो संरक्षक बंधारा न झाल्याने चार दिवसापूर्वी झालेल्या सागरी अतिक्रमणात तळाशील गावाचा काही भूभाग समुद्राने गिळंकृत केला याला पतन विभागाचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष डॉ विश्वास साठे यांनी पतन विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत सागरी अतिक्रमण टाळण्यासाठी तळाशील गावात तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी मालवणचे पतन विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री समाधान जाधव यांच्याकडे केली
दरम्यान, श्री. जाधव यांनी बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे मात्र पुन्हा सागरी अतिक्रमणाचा धोका पोहोचू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही श्री. जाधव यांनी यावेळी दिली.
गेले काही दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून सर्वत्र त्याचा फटका बसला आहे. मालवण तालुक्यातील तळाशील समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने तेथील सुमारे ३०० मीटर भाग वाहून गेला आहे. नवीन बंधारा मंजूर असताना सुद्धा त्याची काही पूर्तता झालेली नाही. त्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ साठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, शहर अध्यक्ष अगोस्तीन डिसोझा, बाबू डायस, मालवण ओबीसी तालुकाध्यक्ष सदानंद मालंडकर, डिसोझा हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ साठे यांनी मालवण तालुक्यातील खोत जुवा, मसुरकर जुवा तसेच मसूरा, देवबाग, तळाशील, खाजणवाडी येथील धोकादायक बंधाऱ्याबाबतही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत चर्चा केली यावेळी डॉ. विश्वास साठे यांनी शासनस्तरावर जे सहकार्य लागेल ते देऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले