बांदा | राकेश परब :
शाळा हा गावाचा मानबिंदू..! गावाच्या जडणघडणीत शाळेचे योगदान महत्त्वपूर्ण असते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गो. ग. आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, राजर्षी शाहू महाराज आदी समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाजास जागृत केले आणि देशात औपचारिक शिक्षणास सुरुवात झाली. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची ज्ञानगंगा गावागावात पोचविण्याचे काम झाले. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात स्थापन झालेल्या जि.प.प्राथमिक आरवली टांक या प्रशालेस १२५ वर्षे पूर्ण होत आहेत.
१२५ वर्षांचा अर्थात शतकोत्तर रौप्य महोत्सवी हा अभिमानास्पद प्रवास साजरा करण्याचे नियोजित करण्यात येत आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शालेय व अंगणवाडी परिसर सुशोभिकरण, शैक्षणिक व पारदर्शक तक्ते, शालेय मैदान, खेळ साहित्य, डिजीटल साहित्य या गरजांची पूर्तता माजी विद्यार्थी, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातूनच शक्य आहे. तरी या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांना आवाहन करण्यात येत आहे की प्रशालेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमास सर्वोतपरी आर्थिक व इतर सहकार्य करावे व कार्यक्रमाच्या यशस्वितेस हातभार लावावा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शंकर जाधव व शाळा व्यवस्थापन समिती जि.प.प्राथमिक शाळा आरवली- टांक श्री.रविंद्र बागकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.