वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रमोद रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ इमारत बांधणीसाठी तालुक्यातील शासकीय भूखंड उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले.
यावेळी आमदार नितेश राणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, राजेंद्र राणे व वैभववाडी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ सन १९८६ मध्ये स्थापन झाला आहे. गेली ३६ वर्ष हा संघ सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना खत विक्री तसेच शेतकऱ्यांची भात खरेदी या संघामार्फत मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच विविध शेती अवजारे, पशुपक्षी खाद्य यांची विक्री देखील या संघामार्फत केली जात आहे. या संघाकडे माल साठवणुकीसाठी स्वमालकीची जागा नाही. गेले चार वर्ष शासकीय भूखंड मिळावा यासाठी वैभववाडी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे संघामार्फत पाठपुरावा सुरू आहे. वैभववाडी भूमी अभिलेख कार्यालयानजीक सर्व्हे.नं.४०/ब/३/१/ या शासकीय भूखंडापैकी पाच गुंठे जागा ही संघाचे कार्यालय व गोदाम बांधकामासाठी मिळावी व ती आपल्या स्तरावरून उपलब्ध करून द्यावी असे निवेदनात प्रमोद रावराणे यांनी नमूद केले आहे.