माझे बालपण कोकणातील मालवण तालुक्यातील पळसंब ह्या गावी गेले. त्यामुळे गावातील येणारे सर्व सण म्हणजे एक पर्वणी असायची.नवरात्र उत्सव म्हणजे एक वेगळी मजा. घटस्थानेच्या पहिल्या दिवसापासून आमच्या श्री देव रवळनाथ पावणाई मंदिरात देवीचा जागर सुरू व्हायचा. रोज रात्री देवळात भजन होत असे. भजनानंतर रोज विशेष खादयपदार्थ मिळायचे . अजूनही प्रथा चालू आहे त्यात आता महिलांना सामावून घेऊन गरबा नृत्य दांडिया हे सुध्दा सुरू आहे.
आमच्या लहानपणी शाळेत श्री देवी सरस्वती पूजन म्हणजे आमच्या ज्ञान आणि कला गुणांना वाव देणारा उत्सव. साधरण सहामाई परीक्षा आणि हा उत्सव जवळ यायचा तेव्हां अभ्यास आणि कला गुणांना जपणे हिच आमची कसरत असायची.
वयाच्या आठव्या वर्षापासून मी छोट्या नाटिका सादर करायला शिकलो.
माझी पहिली नाटिका ‘गरिबीतून मोठं’..! त्यात मी एका बंड्या नावाच्या मुलाचे काम केले होते. तो श्रीमंत मुला बरोबर मैत्री करून आपला अभ्यास करत मोठा होतो. दुसरे नाटक होते ‘कृष्ण सुदामा’ त्यात मी सुदामा झालो होतो.
ह्या सगळ्यांचे संस्कार मनावर झाल्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग सापडला.
त्या नंतर अनेक नाटिका आणि मोठा झाल्यावर नाट्यप्रयोग केले. पुढे जाऊन राज्य नाट्य कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविली. राज्य नाट्य स्पर्धेत रौप्य पदक
मिळाले तेव्हा मला माझ्या शालेय जीवनात घडलेल्या घटणांची आठवण झाली.
डॉ श्रीराम लागू अभिनयासाठी दिलेले बक्षीस कधीही विसरणार नाही. आता निवृत्तीनंतर स्पर्धा बंद केल्या, पण मुंबईतील गावच्या मुलांना घेऊन गावात दोन नाट्यप्रयोग स्वतः दिग्दर्शन करून केले.
त्यामुळे दसरा सरस्वती पूजन हे मला आवडणारे सण .
आमच्या पळसंब गावात दसऱ्या दिवशी श्री देव रवळनाथ श्री देवी पावणाई मंदिरात देवीच्या माहेरवाशीणी आणि गावच्या भगिनी ओट्या भरतात. नंतर तरंग नेसवून देव सोनं लुटण्यासाठी देव आपट्याच्या झाडाकडे जातात. तिथे देवाचं लग्न झाले की सोने लुटून परत श्री जयंती देवी मंदीरात येतात. ही प्रथा गेली अनेक वर्षे चालू आहे.
त्यामुळे दसरा म्हटलं की दिवाळी पूर्वीचा आनंदी उत्सव समजला जातो. ह्या नंतर दिवाळी पर्यंत पिकलेले धान्य घरात यायला सुरू होते. त्यामुळे सणांचा राजा म्हणून सगळे मानतात.
आला दसऱ्याचा सण
सोनं लुटण्यासाठी चला,
एकमेका गळाभेटी
नवीन विचार देऊ चला।
शेतं पिकली सोन्यावाणी,
त्याची कापणी करूया.
दुःख विसरून सारे
आता आनंदी जगुया ||
गिरिधर पुजारे.( मुंबई | पळसंब)