मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर मनसे उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी बंदरजेटीवरील गणेश विसर्जनाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे.
मालवणमध्ये सध्या प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने माजी सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे कोणतेही आवाहन सध्या करणे तांत्रिकदृषट्या तसे शक्य नसल्याने प्रशासनाने व आरोग्य विभागाने मुलभूत व आवश्यक सोयींची व्यवस्था करणे हे क्रमप्राप्त असून बंदरजेटीवर यंदाच्या श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी तशा मुलभूत सोयी नव्हत्या म्हणून मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी खंत व्यक्त केली आहे.
कोरोनाकाळातही विसर्जनादरम्यान बंदर जेटी किनार्यावर बर्यापैकी प्रकाशाची सोय होती परंतु यंदा मात्र विशेष करुन गणपतीच्या अकराव्या दिवशी समुद्राला प्रचंड उधाण असून कोणत्याही प्रकारची प्रकाश योजना नव्हती. दुर्दैवाने काही अनुचित् प्रकार घडला तर या ठिकाणी एक रुग्णवाहिका देखील तैनात करणे आवश्यक असल्याची सूचना विशाल ओटवणेकर यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
बंदरजेटीवरील किनार्यांवर निर्माल्याच्या बाबतीत पर्यावरण जागृती करुन कृती करायला लावणारे न.प.कर्मचारी कार्यरत होते हेही त्यांनी स्पष्ट केले.
बंदरजेटीवरील ऐतिहासिक सुशोभिकरण हा अत्यंत प्रशंसेचा प्रकल्प आहे हे सांगताना विशाल ओटवणेकर यांनी किनार्यांवरील पर्यटक व स्थानिकांच्या सुरक्षेसाठी ‘रक्षक तैनात ठेवणे’ ही सुद्धा पर्यटन नगरी म्हणून मालवणसाठी अत्यावश्यक गोष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यासाठी किनारपट्टीवरील स्थानिक कुशल पोहणार्या युवकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक केल्यास तोही एक रोजगार उपलब्ध करता येईल का यांवर विचार करावा असे मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी स्पष्ट केले आहे. पर्यटनदृष्ट्या प्रगती करताना मनुष्य जीवांची सुरक्षितता हे देखील प्राधान्य दुर्लक्षित राहू नये असे विशाल ओटवणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
मनसेचे मालवण शहर पदाधिकारी, कार्यकर्ते व म.न.वि.से. नेहमीच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण,शिक्षण व आरोग्य विषयक बांधिलकी जपून सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवून असल्याचे प्रतिपादन मनसे उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले आहे. यासंदर्भात प्रशासन व संबंधीत विभागांनी सर्व सूचना व उपाययोजनांवर संकारात्मक व सखोल विचार व चर्चा करुन कायमस्वरुपी व ठोस अशा सोयी उपलब्ध करुन द्याव्यात असे आवाहन मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले आहे.