बांदा | राकेश परब :
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांसाठी बँक ऑफ इंडियाने नेहमीच मदतीचा हात दिला असून बँकेच्या बांदा शाखेच्या वतीने आतापर्यंत कृषी विषयक उपक्रमांसाठी ३५ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना उपलब्ध असून बँक आर्थिक सहाय्य देण्यासाठी तत्पर आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीतून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन बँकेचे अग्रणी जिल्हा मॅनेजर मुकेश मेश्राम यांनी येथे केले.
येथील ग्रामपंचायत सभागृहात बँक ऑफ इंडियाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री मेश्राम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बांदा सरपंच अक्रम खान, बँकेचे बांदा शाखा व्यवस्थापक अंकित धवन, कर्ज अधिकारी सागर कटावते, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये, तलाठी वर्षा नाडकर्णी, कृषी मंडळ अधिकारी प्रकाश घाडगे, कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सरगुरू, तालुका प्रकल्प अधिकारी प्रताप सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, शामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, उमंगी मयेकर तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री मेश्राम यांनी यावेळी शेतकऱ्यांना कृषी कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच किसान क्रेडिट कार्ड, तात्काळ कर्ज, किसान वाहन, एसएचजी यासंदर्भात माहिती दिली. शासनाच्या कृषी विषयक अनेक योजना असून या योजना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष राबविण्यासाठी बँक पतपुरवठा करण्यासाठी केव्हाही तयार असून शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून बँकेच्या शाखेत संपर्क साधावा.
मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी ३१ जुलै पूर्वी ऑनलाईन ई पीक नोंदणी करावी. ई पीक नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचा लाभ मिळू शकतो. जमिनीत सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी अनेक योजना असून यासाठी शासकीय अनुदान देखील आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे अधिकाऱ्यांनी निराकारण केले. यावेळी बँकेच्या बांदा शाखेतून कर्ज मंजूर झालेल्या १० लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्राचे व धनादेशाचे वितरण करण्यात आले. आभार ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान यांनी मानले.