स्वर्गीय गजा प्रभू यांच्या समाजसेवेच्या कार्याला दिला उजाळा..
कणकवली | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील तारामुंबरी सारख्या ठिकाणी आपण समाजाचे देणे लागतो अशा विचारातून व सामाजिक बांधिलकितून स्वर्गीय गजा प्रभू यांनी तारामुंबरी सारख्या ग्रामीण भागात कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचे समाजसेवेचे हे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना सुशांत नाईक म्हणाले की स्वर्गीय गजा प्रभू हे समाजसेवेचा वसा जपणारे आदर्श व्यक्तिमत्व होते. ते सच्चा आणि कट्टर शिवसैनिक होते. शिवसेना विभागप्रमुख व उपसरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी पदाला न्याय मिळवून देताना पक्षसंघटना वाढीसाठी मेहनत घेतली. आणि निवडणूकीत पक्षाला चांगले मताधिक्य दिले. त्यांच्या निधनाने समाजाचे आणि शिवसेना पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
गावच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा स्व. गजा प्रभू मित्र मंडळ जोपासत असून विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम स्व. गजा प्रभू मित्रमंडळ करीत आहे. निश्चितच समाजासाठी एक वेगळा आदर्श मंडळाने निर्माण केला आहे. असेही श्री. नाईक यावेळी म्हणाले.
यावेळी स्व. गजा प्रभू यांच्या प्रतिमेला श्री. सुशांत नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ते तारामुंबरी येथे स्व. गजा प्रभू मित्रमंडळ आयोजित आठवण चषक भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सुशांत नाईक यांनी चांगल्या पद्धतीने स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. त्याप्रसंगी सुशांत नाईक म्हणाले आठवण ज्यांची ठेवली जाते ज्यांना समाजात मान आहे. अशाच माणसांच्या स्मृती ते गेल्यानंतरही जनता जपत असते. त्यांच्याच कार्याची पोचपावती म्हणून देवगडच्या जनतेने त्यांच्या पत्नी साक्षी प्रभू यांना देवगड-जामसंडे च्या नगराध्यक्षा करून दिली आहे. यावेळी व्यासपीठावर देवगड जामसंडे च्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, युवासेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, नगरसेवक बुवा तारी, रोहन खेडेकर, नितीन बांदेकर, मनीषा घाडी, शाखाप्रमुख विजय जोशी, हितेश खवळे, कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे, विभागप्रमुख रिमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी सुशांत नाईक यांचा स्वर्गीय गजा प्रभू मित्र मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वर्गीय गजा प्रभू प्रेमी व मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.