विरोधकांना विकासकामांशी स्पर्धा करण्याचे केले आवाहन…!
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उंबर्डे गावाने मागील सात वर्षात जे जे मागितले ते मी दिले आहे. सद्यस्थितीत दीड कोटीची कामे प्रगतीपथावर आहेत. विरोधक विकासाची स्पर्धा माझ्याशी करूच शकत नाही. परंतु माझी मुस्लिम समाजात बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम ते करत आहेत. माझ्या मतदारसंघात सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विशेषतः मुस्लिम समाज बांधव व राणे कुटुंबीय यांचं नातं अतूट आहे. मुस्लिम बांधवांच्या घरातील मी एक सदस्य आहे. इतर कुठेही काहीही होत असुदे परंतु त्याची झळ माझ्या मतदारसंघात पोहचणार नाही, याची जबाबदारी माझी असेल. असे रोखठोक मत आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले. यापुढेही गावातील सर्व सण, उत्सव व उपक्रम हे जल्लोषात सर्व समाज बांधव एकत्रित पार पाडतील असा विश्वासही आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उंबर्डे येथे बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, किशोर दळवी, रज्जब रमदुल, बाबा कोकाटे, संताजी रावराणे, दशरथ दळवी, समाधान जाधव व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, विरोधी पक्षाचा मी आमदार आहे. परंतु उंबर्डे वासियांना विरोधी पक्षाचा आमदार असल्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही. जे मागितले ते ते सर्व उंबर्डे गावाला दिले आहे. जिओ टाॅवर कोळपे येथे दिला आहे. विकासात कुठेही मागे पडलो नाही. आणि पडणार नाही. मागील चार दशके केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत इथली जनता ठामपणे सोबत आहे याची मला जाणीव आहे. सद्यस्थितीत राणे कुटुंब व मुस्लिम बांधवांत दरी वाढवण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. माझे जुने ट्विट पसरवत अपप्रचार करत आहेत. परंतु सात वर्षात मी केलेले कार्य ही प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. ज्या काही घडामोडी होत असतील त्या राज्यात होत आहेत. त्याचा इथे अजिबात फरक पडणार नाही असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, विकासाला प्राधान्य देण्याचे राजकारण मी आजही करत आहे. उद्याही करत राहणार आहे. विरोधकांना खुमखुमी असेल तर त्यांनी माझ्याशी विकास कामांची स्पर्धा करावी असे थेट आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.
विरोधकांना निवडणूक जवळ आली कि क्रिकेट आठवतो. गावात क्रिकेटसाठी पैसे देतात आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. इतर वेळी ते कुठे असतात असा सवाल ही त्यांनी केला. सरपंच एस.एम. बोबडे म्हणाले, गावात विकासाची गंगा केवळ नितेश राणे यांच्यामुळेच आली आहे. विरोधक निव्वळ भुलभुलय्या करत आहेत. त्यांच्या भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही. क्रिकेटपटू घडावेत यासाठी आ. राणे यांनी अकॅडमी सुरू केली आहे. विनोद कांबळी सारखे दिग्गज खेळाडू अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. ही खेळाडूंना संधीच त्यांनी उपलब्ध करून दिली आहे असे सांगितले. अरविंद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रज्जब रमदुल यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवा खेळाडू उपस्थित होते.
