
मालवण | सुयोग पंडित (संपादकीय ) : “सत्यवान यशवंत रेडकर.”…एक ओळखीचे वाटावे परंतु नेमकी व्यक्ती कोण किंवा कधी भेटलो नाही असे वाटणारे एक नांव.
त्याचा जन्म सामान्य कुटुंबातला. कुर्ल्यातील अतीसामान्य वस्तीतील बालपण.
दाटीवाटीच्या कुर्ल्यात पंख पसरणे दूरच तर हातपायही नीट हलवता येऊ शकणार नाही अशा ठिकाणी वाढत गेलेले त्याचे तरुणपण.
आसपासची चार पोरं शाळेत जातायत म्हणून स्वतःही शाळेचा रस्ता पकडलेला तो नववीपर्यंत शाळेत फक्त जात येत होता.
नववीतच त्याला जीवना पहिल्यांदा हरणे म्हणजे काय ते समजले आणि ते हरणे पुढे जीवनातील त्याचे शेवटचे हरणे ठरले.
तो चेतला…तो पेटला…तो प्रकाशीत झाला..!
शिक्षण म्हणजे काय.. ? शिक्षण असणे काय देऊ शकते आणि शिक्षण नसणे काय काय हिरावू शकते या विचारांच्या असंख्य टाचण्यांनी त्याच्या आत्म्याला,मेंदूला आणि जीवनाला सचेतना दिली.
नववीत नापास होणे हे अपयश त्या नववीच्या परिक्षेचा परिणाम नाही तर ती स्थिती शिक्षण मन न लावून घेतल्याने, ज्ञान होतकरुपणे शोषता न आल्याने आणि अभ्यास न केल्याने झालीय अशा विचारांनी स्वतःवरील आरोपांचा काळ्याकुट्ट रंगाचा डबा त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वावर ओतून घेतला…!
आता तो स्वतःसाठी दोषी होता..!
आता त्याला एकच काम करायचे होते ते म्हणजे ‘शिक्षणरंगात न्हायचे’ होते..!
नापासीचा रंग त्याला शरम वाटत नव्हता कारण त्या रंगाचा काहीच दोष नव्हता हे त्याने जाणले.
शैक्षणीक बेफिकिरीचा कृत्रीम रंग मात्र त्याला आता हळूहळू शिक्षण रंगाच्या कुंचल्याने नाहीसा करायचा होता.
शिक्षणरंगात न्हाणे तसे सोपे नव्हते.
प्रथम त्याने स्वतःतील शैक्षणिक आळसावर काम करायचे ठरवले.
जे जे अवघड ते ते माझ्या वाट्याला यावेच या इच्छेने तो एकेका अवघड गोष्टीला,विषयाला ,समिकरणाला आणि व्याकरणाला सामोरा जाऊ लागला.
पडला…कुढला…धडपडला…शंकित झाला…परावृत्त करायच्या शक्तींना भिडला पण तो थांबला नाही….!
तो शिक्षणरंगाच्या नदीच्या दिशेलाच धावत राहीला.
त्याचा निग्रह जन्मजात नव्हता. त्याची ताकद टाॅनिक आणि मसाजवर पोसलेली नव्हती तर आणि त्याच्या घरचा खिसाही कोण्या सुखवस्तुचा नव्हता..!
“मला शिक्षण घ्यायचंय…मला शिक्षणच घ्यायचंय….शिक्षणापर्यंत मला जातच रहायचंय..” या एका जाणीवेपोटी तो विद्यार्थी दशेत कामगारही झाला.
काय नसले की काय होते…आणि काय असले की काय काय करता येते या असण्या नसण्यातील लसावि व मसावि फक्त आणि फक्त शिक्षणच आहे …ज्ञानच आहे हे आता त्याचे चलन बनले.
बुद्धी जन्मजात असते हे खरेही असेल कदाचित परंतु अभ्यास करुन शिक्षण घेत मठ्ठातील मठ्ठ..किंवा आळशातील आळशीही बुद्धीवंत घडू शकतो हे त्याचे जीवनतत्व बनले.
पुढे दहावी…बारावी….पदवी..!
पुढे स्पर्धा परिक्षा हा अशक्यप्राय विषयही त्याच्या स्वयंप्रकाशाने सुकर बनला .
आज सरकारी नोकरी किंवा स्वतःचा दिलासा म्हणावा अशी मुंबई सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवादक अधिकारी म्हणून तो काम अधिकारी सेवा देतो.
पण मंडळी तो नववी नापास झालेला … स्वतःच्या शैक्षणीक अनास्थेने अतिशय दिलगिरीने अदृश्य काळ्या रंगाचा काळा डबा त्याने ओतताना स्वतःला संपूर्ण संधी दिली. स्वतःच्या दोषाला कोष न बनवता त्याने त्या कोषाची टरफले चिरडून त्याची भुकटी केली.
त्याने वाद नाही तर शिक्षणाचा त्याच्याशी संवाद घडवला आणि आज तो महाराष्ट्रातील एक मनस्वी शिक्षणप्रसारक म्हणून कार्य करतोय.
सरकारी नोकरीच्या कर्तव्य सेवेतून वेळ मिळेल तसा आणि तेंव्हा तो फक्त शिक्षण…ज्ञान..बुद्धी..विद्यार्थी…परीक्षा…पालक…शिक्षक..अभ्यास या रंगांमध्येच रंगतोय…आणि तेही निःशुल्क..!
होय…संपूर्ण मोफत…!
त्याला शासकीय गांव घडवायचाय. त्याला शिक्षणाबद्दलचे बागुलबुवा पळवून नाही तर भस्म करुन टाकायचेत..! पदे..संधी..कामगिरी यांचे ज्ञानरंग किती आवश्यक आहेत आणि ते रंजकही आहेत यासाठी बालपिढी आणि युवा वर्गाला तो आकृष्ट करु इच्छितोय.
तो वेडा वाटेल….त्याला फरक नाही .
तो अहंकारी वाटेल…त्याला फरक नाही..
तो अट्टाहासी वाटेल…त्याला ते मान्य आहे.
होय तो आग्रहीपणाची आणि कल्पनांच्या रॅपरमधली चाॅकलेटं वाटत फिरत नाही तर शैक्षणीक वस्तुनिष्ठ जाणिवांचे अट्टाहासाचे कडक लाडू वळून त्यांना ग्रहण करायची पायाभूत युक्ती शिकवतो.
त्याची छोटी मुलगी त्याला तेनाली रामा म्हणते हेही तो आनंदाने सांगतो कारण तेनाली रामा कोण आहे याची ओळख घ्यायची बुद्धी जर ती चिमुरडी तिच्यात नांदवू शकतेय तर ती असेलच तेनाली रामाची मुलगी..!
ज्ञानरंगाची…शिक्षणरंगाची पिढी पुढे आणत आणत शासकीय गांव घडवणे हे त्याचे स्वप्न आहे कारण तो सांगतोच की ‘ जिथे उभा राहीन तिथे चिंतन आणि जिथे मार्गदर्शन तिथे परिवर्तन..!’
खूप रंगीत स्वप्न आहे हे त्याचे.
त्या स्वप्नाच्या मार्गावरील सगळे अवरंगही तो जाणतो आणि त्या अवरंग किंवा अवगुणांपासून चालू पिढीला कसे परावृत्त करुन शिक्षणरंगाच्या नदीवर आणायचे या युक्त्यांचे कुंचलेही तो पालकांना,शिक्षकांना वाटतो.
स्वतःतील शैक्षणिक पात्रतेचा गर्व नाहिय त्याला परंतु त्याच्या व्यक्तिमत्वाला चमकवलेल्या शिक्षणाच्या रंगाचा त्याला जरुर अभिमान आहे.
समाजाकडून त्याला त्याने स्थापन केलेल्या ‘तिमिरातुनी तेजाकडे ‘ या शैक्षणिक प्रतिष्ठानाला अनेक शिक्षण आस्थेच्या रंगांचा, प्रत्येकी सहकाराच्या रंगाचा एकजरी तुषार मिळाला ना तरी अख्खा भारत शिक्षणरंगाची रंगपंचमी साजरी करेल…ज्ञानरंगाची धुळवड खेळेल..!
सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)