काव्यरसिक मंडळ,डोंबिवलीचा सर्वोत्कृष्ट गझल संग्रह पुरस्कार.
गझलकारेच्या पहिल्याच गझलसंग्रहाला मिळालेला सन्मान सिंधुदुर्ग जिल्हा साहित्याचा गौरव वाढवणारा…!
मालवण | सुयोग पंडित (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड (वाडा) येथील साहित्यिक तथा गझलकारा सौ.माधुरी चव्हाण जोशी यांच्या ‘मधुघट’ या पहिल्याच गझलसंग्रहाला काव्यरसिक मंडळ,डोंबिवली यांचा सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या दिनांक 13 मार्चला हा पुरस्कार ज्येष्ठ कवी सलील मोमीन यांच्या उपस्थितीत विनायक सभागृह डोंबिवली (पूर्व), येथे हा पुरस्कार मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात वितरीत केला जाणार आहे.
तशा संदर्भातील अधिकृत पत्र मंडळाच्यावतीने अध्यक्ष श्री महेश देशपांडे यांनी पाठविले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अत्यंत उच्च स्तरावरील साहित्यिक आणि गझलकारा अशी ओळख असणार्या सौ.माधुरी चव्हाण जोशी यांनी या पुरस्काराच्या घोषणानंतर त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत तसेच दिवंगत कवी श्री.मधुसुदन नानिवडेकर यांच्या मार्गदर्शक स्मृतींनाही वंदन करुन उजाळा दिला आहे.

सौ.माधुरी चव्हाण जोशी यांच्या मधुघट गझल संग्रहाच्या या पुरस्कार प्राप्तीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गौरवशाली साहित्य श्रृंखलेला आणखीन प्रेरणा मिळाली असल्याची जिल्ह्यातील साहित्य रसिकांची भावना आहे.
सौ.माधुरी चव्हाण जोशी यांची सर्वच स्तरांतून आणि विविध समाज मंचांवरुन प्रशंसा होत आहे.