सकल मराठा समाजाने दिले कणकवलीचे तहसीलदार व पोलिसांनी निवेदन.
कणकवली | उमेश परब : छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा म्हणून कणकवलीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण १ मार्चला करण्यात आहे.हे उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.याबाबत सकल मराठा समाज कणकवली यांनी तहसीलदार आर. जे.पवार व पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे भाई परब,सोनु सावंत ,सुशिल सावंत,सुशिल दळवी, महेंद्र सांब्रेकर, संजय राणे,संदीप राणे,महेश सावंत,सादिक कुडाळकर,महेंद्र गांवकर आदींसह मराठा समाज पदाधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,आजपर्यंत मराठा आरक्षणाकरीता ५८ मोर्चे न भूतो न भविष्यती असे निघाले . कुठल्याही सरकार दरबारी निर्णायक असे यश आले नाही . घटनात्मक मार्गाने मराठा समाजाने केलेली विनंती सरकार दरबारी फोल ठरली . अनेक कायदेशीर प्रक्रिया आणि अंतिमतः उपोषण असा प्रवास सुरू झाला आहे . आपले छत्रपती युवराज संभाजी राजे अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत . आमच्या पुढील पिढीला भविष्यासाठी साथ देण्याकरीता राजे उपोषण करत आहेत . अशावेळी मराठा समाजाचे जबाबदार ज्ञाती म्हणून स्वस्थ बसणे आमच्या रक्तात नाही . श्री छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा म्हणून आम्ही कणकवली तालुक्यातील सकल मराठा समाजाचे बांधव एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहोत .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने मंगळवार दिनांक १ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहोत . आता तरी समाज भावना ओळखून आपण सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडाव्यात अशी मागणी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे सकल मराठा समाजाने केली आहे.