आरोग्य यंत्रणेला मजबुती देण्यासाठी कै.सावित्री विष्णू खर्डे यांच्या स्मरणार्थ करणार अत्यावश्यक आरोग्यविषयक सामाजिक मदत..
बांदा | राकेश परब : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळण्यासाठी मडुरा दशक्रोशीसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका देणार आहे. रुग्णवाहिकेअभावी नातेवाईकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कै.सावित्री विष्णू खर्डे यांच्या स्मरणार्थ खर्डे कृषि सेवा केंद्र मडुरा तर्फे सदर रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा, उद्योजक सागर खर्डे यांनी पाडलोस येथे केली.
पाडलोस केणीवाडा येथे आयोजित कार्यक्रमात श्री. खर्डे बोलत होते. व्यासपीठावर भाजपा सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे, युवा मोर्चा सावंतवाडी सरचिटणीस काका परब, समाजसेविका अर्चना पुनाळेकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मडुरा दशक्रोशीत रुग्णवाहिका आवश्यक असल्याची अनेक वर्षांची मागणी आहे. अनेक अपघात घडून रुग्णवाहिके अभावी रुग्णांसह नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शेकडो नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून रुग्णवाहिकेची मागणी केल्यामुळे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्यासाठी आपण कै.सावित्री विष्णू खर्डे यांच्या स्मरणार्थ खर्डे कृषि सेवा केंद्र मडुरा तर्फे रुग्णवाहिका देणार असल्याची ग्वाही उद्योजक श्री. खर्डे यांनी दिली. तसेच भविष्यात सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा नाईक यांनी केले. प्रास्ताविक रंजन नाईक यांनी तर आभार मंदार परब यांनी मानले.