कुडाळ | ब्यूरो न्यूज : बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे, जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. सहा. धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.
दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व फ्लोरेन्स नाईंटीगल यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. कल्पना भंडारी, प्रा.सौ. वैशाली कोलगावकर, सौ. शांभवी आजगावकर, सौ. सुमन करंगळे, प्रणाली मयेकर, प्रथमेश हरमलकर, वैजयंती नर, शंकर माधव आदी उपस्थित होते.

नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. कल्पना भंडारी व मान्यवर यांनीही सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी भित्तीपत्रिका, प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी या स्पर्धांच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात विविध कलागुणांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील गुणगौरव या दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेजल नाईक यांनी केले.