मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणच्या इतिहास अभ्यासक सौ. ज्योती बुवा तोरसकर यांना कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठातून डाॅक्टरेट पदवी प्रदान झाली. त्यांनी गेली आठ वर्षे ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले इतिहास आणि पर्यटन’ या विषयावर संशोधन केले होते. विद्यापीठाने त्यांच्या संशोधनाला मान्यता दिली आणि त्यांना विद्यापिठात विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी ही पदवी १९ मार्च रोजी प्रदान करण्यात आली. प्रा. ज्योती बुवा तोरसकर ह्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल येथे सहा. शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
गोवा विद्यापीठाचे डॉ. श्री. रोहित फालगावकर तसेच हातकणंगले येथील श्री. अण्णासाहेब डांगे महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्री. निरंजन कुलकर्णी व प्रा. डॉ. कविता गगराणी यांच्या समितीने ही मौखिक परीक्षा घेतली आणि या विषयासंदर्भात सखोल चर्चा करून या प्रबंधाला मान्यता दिली. या प्रबंधाच्या सादरीकरणासाठी मालवणच्या स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रबंधातील विषयांमध्ये सिंधूदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग, किल्ले निवती, यशवंतगड या किनारकोट आणि जलदुर्गांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडातील इतिहास मांडला आहे. ऐतिहासिक पर्यटन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकंदर पर्यटनाच्या सद्यस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. जलदुर्ग आणि किनारकोटांच्या परिसरातील स्थानिकांची या किल्ल्यांबाबत असलेली जाणीव जागृती, त्यांचा पर्यटनावर आधारित विकास, पर्यटनामुळे निर्माण झालेल्या रोजगार संधी, तसेच त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात झालेले बदल, यांचे प्रश्नावलीच्या माध्यमातून डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी सर्वेक्षण करून त्याचे निष्कर्ष या प्रबंधात मांडले आहेत. त्याचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्था, पुरातत्व खाते, शासकीय विभाग, पर्यटन आणि इतिहास तज्ञ यांना सागरी किल्ले विकासासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करण्यासाठी होऊ शकेल. सागरी किल्ले जतन आणि संवर्धन करून, पर्यटन व्यवसायात सागरी किल्ले महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे भविष्यात त्यांनी सुचविलेल्या जतन संवर्धन तसेच पर्यटन वाढीबाबत उपाययोजना आणि शिफारसी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आणि मराठी सागरी सत्तेचा महत्वाचे अंग असलेले सागरी किल्ले व आरमार हे संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. इतिहासाचा हा धागा पकडून, त्याची सांगड रोजगार तसेच अर्थ निर्मिती करणाऱ्या पर्यटनाशी घालून डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी सिंधुदुर्ग मधील सागरी किल्ले इतिहास व पर्यटन हा बहुविद्याशाखीय विषय पीएचडी साठी निवडली होती असे या संशोधनाचे वेगळेपण बहिस्थ परीक्षक डॉ. रोहित फालगावकर यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले. या विषय आणि अनेक ग्रंथालये , गॅझेटियर, मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे, पोर्तुगाल, लिस्बन सारख्या अर्काइव्हज मधून मिळविलेले अस्सल नकाशे, पुस्तके इत्यादी संदर्भ साधनांचा वापर करून केलेल्या सखोल आणि समाजोपयोगी संशोधनाबाबत विद्यापीठ परीक्षण समितीने समाधान व्यक्त केले. या संशोधनातून सर्वपरिचित किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग बरोबरच इतर सहा किल्ल्याचा दुर्लक्षित इतिहास जगासमोर आला आहे, त्याचबरोबर जलदुर्ग पर्यटन बाबत नोंदविलेला अभ्यास भविष्यातील ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी, धोरण निर्मितीसाठी एक रोडमॅप , मैलाचा दगड ठरणार आहे, असे निरीक्षण परीक्षण समितीने नोंदविले.
ज्योती बुवा तोरसकर यांच्या शोध निबंध मौखिक परीक्षण अर्थात ओपन डिफेन्स साठी विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक इतिहास अभ्यासक, एम आणि पीच डी चे विद्यार्थी, मराठी विभाग प्रमुख रणधीर शिंदे, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती चे श्री. हेमंत वालकर, श्री. भाऊ सामंत, श्री. रविकिरण तोरसकर व कुटुंबीय उपस्थित होते. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉ. सुमेधा नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यापीठातील इतिहास विभागात हे परीक्षण पार पडले. यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील व सहकारी यांचे सहकार्य लाभले.
इतिहासाबरोबरच पर्यटन दृष्टिकोनातून केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ल्यांचे हे पहिलेच बहुविद्याशाखीय संशोधन ठरले आहे. प्रा. डाॅ. ज्योती बुवा तोरसकर यांचे सर्व स्तरातून तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवणच्या वतीने अध्यक्ष गुरुनाथ राणे यांनी अभिनंदन केले आहे.