पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वेरली येथे जागृत देवस्थान श्रीदेवी सातेरी आणि इतर देव पंचायतन सोमवार दिनांक २ डिसेंबर पासून गावातील देवस्थानांच्या भेटीला जाऊन सीमोल्लंघन सोहळा होणार आहे. यानिमित्त सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध धार्मिक विधी नंतर श्री सातेरी पंचायतन देव तरंगांसह श्री देव गांगेश्वराच्या भेटीला जाणार असून गांगेश्वर देवस्थानात रात्री निवास करणार आहेत व गांगेश्वर मंदिरा ठिकाणी स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी श्री देव गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद होणार असून त्यानंतर श्री देवी सातेरी पंचायतन श्री देव रवळनाथ देवालय (चव्हाटा राई) येथे जाणार असून त्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. श्री देव रवळनाथ देवालय येथे यानिमित्त रात्रौ श्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर दिनांक ४ डिसेंबर रोजी श्री देव रवळनाथ देवालय येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सायंकाळी श्री देवी सातेरी पंचायतन मुणगेकरवाडी वाडी येथील विठ्ठलादेवी देवस्थान येथे भेटीला येणार असून विठ्ठलादेवी येथे मुक्कामी राहणार आहेत यावेळी रात्रौ विठ्ठलादेवी चाळा येथे भाविकांचे नवस बोलणे फेडणे आदि कार्यक्रम होणार आहेत. गणगुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी विठ्ठलादेवी देवस्थान येथे दुपारी महाप्रसाद होणार आहे त्यानंतर श्रीदेवी सातेरी पंचायतन देवतरंगांसह सातेरी देवी मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात महाप्रसाद होणार असून सायंकाळ नंतर पाच दिवसांच्या देव परिक्रमा भेट सोहळ्याची विधिवत सांगता होणार आहे.मागील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच हा सोहळा वेरली गावात होणार असल्याने वेरली गावातील मुंबई निवासी ग्रामस्थ मुंबई निवासी माहेरवासीनी पाहुणे आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात वेरली गावात दाखल झालेले आहेत तरी सर्व भाविकांनी या संपूर्ण सोहळ्याचा उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन वेरली गावातील ग्रामस्थांनी केले आहे.