चित्रीकरण प्रकल्पात देवगडातील साळशी, पोंभूर्ले, कोटकामते ही गावे झळकणार..!
शिरगांव | संतोष साळसकर : दिड दशकापूर्वी एका मनोरंजन वाहिनी वरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ मुळे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन महाराष्ट्रातील घराघरात अतिशय लोकप्रिय झाले. सध्या हे दोघेही देवगड तालुक्यात चित्रीकरणासाठी आले आहेत. ‘नमामि वरदायिनी’ या त्यांच्या युट्युब चॅनेलमधून नवरात्रोत्सवात पोंभुर्ले, कोटकामते आणि साळशी गाव झळकणार असून मंदिरांचा इतिहास, स्थापत्य शास्त्रातील गोष्टींबरोबरच उत्सवाची माहिती मिळणार आहे.
मुग्धा, प्रथमेश यांनी लग्नानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव कोकणात साजरा केला. प्रथमेश याचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील असले तरी आजोळ देवगड तालुक्यातील चाफेड – भोगलेवाडी येथील असल्यामुळे लहानपणापासून त्याचे या ठिकाणी येणे जाणे असते. म्हणूनच श्रावण महिन्यात त्याने ‘शिवश्रावणी’ या युट्युब चॅनेलवरील मालिकेतून सिंधुदुर्गातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरातील माहिती प्रसारित केली होती. दोघेही देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री सिद्धेश्वर पावणाई मंदिरात चित्रीकरणासाठी गुरुवारी सकाळी आले होते. प्रथम देवदर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराच्या परिसरातील चित्रीकरण केले. यावेळी देवस्थानच्यावतीने त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत चाफेड, साळशी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दोघेही आजूबाजूचा निसर्ग अनुभवत पोंभुर्ले या गावी चित्रीकरणासाठी रवाना झाले.
नवरात्रोत्सवात तिन्ही गावांच्या मंदिरांचा इतिहास, स्थापत्य शास्त्रातील गोष्टी, मंदिरांचे बांधकाम, कोरीव काम, मूर्तीची वैशिष्टये यासह उत्सवातील माहिती मुग्धा वैशंपायन त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रथमेश आणि मुग्धा हे दोघेही देणार आहेत.