मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवच्या आंगणेवाडीच्या माळरानावर आढळून आलेल्या ‘बँडेड रेसर’ या सर्पाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिनविषारी साप असून दक्षिण कोकणात नायकुळ तर विदर्भात याला धूळनागीण म्हणतात.
आंगणेवाडी माळरानावर काहीसा वेगळा असलेला हा सर्प दिसून आल्यानंतर बाबू आंगणे यांनी सर्प मित्र स्वप्नील परुळेकर याना पाचारण केले.

त्यांनी या सर्पाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. याची सरासरी लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असते. रंग फिकट किंवा गडद तपकिरी, शरीर लांब, निमुळते टोकदार डोके, शेपूटही लांब व निमुळती असते. दिसण्यात नाग सापाशी साधर्म्य असल्यामुळे याला धूळनागिन म्हटले जात असावे. या सापाची मादी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान ५-६ अंडी घालते.
धूळ नागिणीचे प्रमुख खाद्य उंदीर असल्यामुळे धामण प्रमाणे हा साप सुद्धा शेतकऱ्याचा मित्र ओळखला जातो. याचे वास्तव्य गवतात, झुडूपात, उंदरांच्या बिळात किंवा दगडांमध्ये असते. हा साप दिनचर म्हणजे दिवसा फिरणारा असून डिवचले गेल्यास मानेचा भाग फुगवतो. त्यामुळे काहीसा नागासारखा दिसत असल्यामुळे याला विषारी नागच समजून हत्या होते अशी माहिती सर्प मित्र परुळेकर यांनी दिली. त्यामुळे कोणत्याही प्रजातीचा सर्प दिसून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रास बोलावण्याचे आवाहन तथा संदेश परुळेकर यांनी दिला आहे.